शासनाच्या नावाखाली दहीहंडी गोविंदा विमा योजनेत गोंधळ – शासन की असोसिएशनचा खेळ?

शासनाच्या नावाखाली दहीहंडी गोविंदा विमा योजनेत गोंधळ – शासन की असोसिएशनचा खेळ?
ठाणे: दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा मानबिंदू असलेला सण आहे. या सणाला नवे रूप, नवा उत्साह देण्याचे कार्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केले होते. त्यांनी दहीहंडी सणाला एक सांघिक ऐक्याचा आणि पराक्रमाचा उत्सव म्हणून समाजासमोर उभा केला. त्यामुळेच आज हा सण लाखो भाविकांच्या भावनांचा केंद्रबिंदू बनला आहे.
गोविंदांच्या सुरक्षेसाठी शासनाने मोफत अपघाती विमा योजना राबवणे हा स्वागतार्ह निर्णय आहे. मात्र, प्रत्यक्षात या योजनेसाठी तयार करण्यात आलेला फॉर्म अत्यंत किचकट, अव्यवहार्य आणि लहान-मोठ्या गोविंदा पथकांसाठी अन्यायकारक आहे.
या फॉर्ममध्ये एकाच फॉर्ममध्ये दोन वेळा मंडळाचे नाव, दोन मोबाईल नंबर आणि दोन ईमेल आयडी मागण्याचा अर्थ काय? हे फक्त गोंधळ निर्माण करणारे आहे. प्रत्येक फील्डवर स्टार मार्क ठेवून जबरदस्तीने सर्व माहिती भरण्यास भाग पाडले जात आहे. एखाद्या माहितीचा अभाव असल्यास फॉर्म नाकारला जाणार का? मग गरीब आणि ग्रामीण भागातील पथकांचे काय?
मंडळाच्या लेटरहेडवरचा अर्ज आणि सर्व गोविंदांची यादी फक्त 1 MB च्या PDF मध्ये अपलोड करण्याची अट हास्यास्पद आहे. ग्रामीण भागातील मंडळांकडे अशी तांत्रिक साधने नसताना एवढ्या गुंतागुंतीच्या अटी लादणे म्हणजे सणाच्या आनंदावर पाणी फेरणे.
ही योजना शासनाच्या निधीतून राबवली जात आहे, तर एवढ्या किचकट अटी असोसिएशनकडून का घालण्यात येत आहेत? हे स्पष्टीकरण सरकारने द्यावे.
यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी इशारा दिला आहे की :
“दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सण आहे, तो कोणत्याही बोगस नियमांच्या जोखडात अडकवू नका. गोविंदांचा विमा हा हक्क आहे, उपकार नाही. शासनाने तात्काळ या फॉर्ममधील गुंतागुंतीच्या अटी रद्द करून ओरिएंटल इन्शुरन्स कार्यालयात एक खिडकी योजना चालू करावी व सोपी प्रक्रिया लागू करावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि शासन तसेच असोसिएशन जबाबदार राहतील.”
दहीहंडीचा आनंद, गोविंदांची सुरक्षा – हीच खरी प्राथमिकता असावी. नियमांच्या नावाखाली सणाचे स्वरूप बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा मान ठेवत हा सण पूर्वीप्रमाणे आनंदात पार पडला पाहिजे. असे मत केदार दिघे यांनी मांडले आहे.